अशोक खरातला मदत करणाऱ्या अधिकाऱ्यांची बदली नाही, थेट बडतर्फी ; महसूलमंत्र्यांचा इशारा

Foto
नाशिक : राज्यात सध्या नाशिकमधला भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण केंद्रस्थानी असून अशोकचे एकापेक्षा एक कारनामेही समोर येत आहेत. त्यातच, अशोक खरातच्या मोबाईल कॉलिंगचे सीडीआर काढण्यात आले असून त्यामध्ये दिग्गज नेते आणि काही अधिकाऱ्यांचीही नावे असल्याची माहिती समोर येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर आता महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना थेट इशाराच दिला आहे. अशोक खरातला मदत करणाऱ्या अधिकाऱ्यांची केवळ बदली नाही तर खरातला मदत करणाऱ्या अधिकाऱ्यांना बडतर्फ करणार, मग ते कोणत्याही खात्यातील असो, असा स्पष्ट शब्दात इशाराच चंद्रशेखर बावनकुळे  यांनी दिलाय.

अशोक खरात प्रकरण हे महाराष्ट्राचा संस्कृतीला काळिमा फासणारी घटना आहे. त्यामुळेच, याप्रकरणी एसआयटी योग्य पद्धतीने कारवाई करत आहे. ज्यांच्याकडे पुरावे असतील त्यांनी एसआयटीला पुरावे द्यावेत. नाशिकच्या संस्कृतीला काळिमा फसण्याचा जे काम झालं आहे, त्या संबंधित लोकांवर कडक कारवाई केली जाईल. आमच्या अधिकाऱ्यांनी जर मदत केली असेल तर त्यांच्यावर देखील कारवाई होईल. एसआयटी टीमकडून आमच्याकडे नाव आल्यावर त्यांना नोकरीवर ठेवणार नाही, असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले. 

अशोक खरात प्रकरणात कोणीही सुटणार नाही, याप्रकरणी SIT तपास करत आहेत, त्यात ज्या ज्या अधिकाऱ्यांची नावे समोर येतील त्यांना कामावरून काढून टाकणार, असा इशाराच चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला. अशोक खरातच्या भागातील CCTV तपासणार आहोत, त्यात जे दिसून येतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल. अशोक खरातला जमिनी मालमत्ता जमा करण्यासाठी मदत करणाऱ्यांवरही कारवाई करणार आहे. केवळ बदली नाही तर खरातला मदत करणाऱ्या अधिकाऱ्यांना बडतर्फ करणार, मग ते कोणत्याही खात्यातील असो, असा स्पष्ट शब्दात इशाराच चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलाय. 

मुख्यमंत्री कार्यालय अशी माहिती देणार नाही
अंजली दमानियांकडे सीडीआर कुठून आले यासंदर्भात संजय राऊत यांनी विचारलेल्या प्रश्नावरही बावनकुळे यांनी उत्तर दिलंय. मुख्यमंत्री कार्यलय अशी माहिती देणार नाही, त्यांनी माहिती काढली असेल. हा प्रकार खूप संवेदनशील आहे, त्यामुळे अशी माहिती मुख्यमंत्री कार्यालय देणार नाही. अंजली दमानिया यांच्याकडे जी माहिती आहे, त्यांनी ती एसआयटीकडे द्यावी. शिर्डी प्रकरणात माझ्याकडे सुनावणी लावली तर मी त्यावर निर्णय घेतो, दुष्कृत्यामध्ये सहभागी असतील त्यांच्यावर कारवाई होईल, असे बावनकुळे यांनी सांगितले.